हडपसर, पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. हडपसर औद्योगिक वसाहतीतील कै. शंतनुराव किर्लोस्कर चौक येथे “जनता दरबार” या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात “शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे” यांच्या जीवन आणि साहित्यावर आधारित पुस्तके नागरिकांना वितरित करण्यात आली. सामाजिक जागरूकता आणि विचारांचा प्रसार हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे आयोजन “महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल” आणि “दत्ता भाऊ कांबळे युवा मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर (झोन ५) तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्ता कांबळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “आजची महाराष्ट्राची संस्कृती व सामाजिक भान चुकीच्या दिशेने जात आहे. महापुरुषांच्या विचारांची वजाबाकी होत असून, हे सामाजिक ऐक्यासाठी घातक आहे. आज सर्व महापुरुषांच्या विचारांची बेरीज होणे ही काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमाला पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक प्रशांत तुपे, नगरसेवक खंडू लोंढे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक आनंद आलकुंटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आयोजक म्हणून अमन भैनवाल, वामन धाडवे, विनोद गायकवाड, दिलीप शिरसागार, अरुण अल्हाट, शेखर अरगडे, सतीश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत महापुरुषांच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




