अवैध पिस्तूलसह दोन आरोपी अटक
दि. 10/04/2026, वार : शुक्रवार
पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाया सुरू असून नर्हे पोलीस स्टेशनच्या पथकाने पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करत पोलिसांनी एका पिस्तूलसह चार जिवंत काडतुसे जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो रोखल्याचे मानले जात आहे.
दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार निलेश भोरडे व सुनील चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नर्हे परिसरातील अभिरुची मॉलचे बाजला, व्दारका लॉजमध्ये काही संशयित व्यक्ती अवैध शस्त्रासह थांबले आहेत. या माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सापळा रचण्यात आला.
पोलीस पथकाने संबंधित लॉजवर छापा टाकला असता रूम नंबर २०५ मध्ये दोन व्यक्ती आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे साहिल सतीश मेहेरे (वय ३९, रा. अहिल्यानगर) व शुभम सचिन अजेटराव (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी सांगितली. संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेतून एक लोखंडी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे आढळून आली.
यावेळी पोलिसांनी त्वरित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर येत असून या शस्त्रांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी नर्हे पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोधफोडे करत आहेत.
पुणे शहरात गेल्या काही काळात अवैध शस्त्रांचा वापर आणि तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे अशा कारवायांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. पुणे शहर संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण लिटे, यांचे पथकाने केली, या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहभागी पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे स्पष्ट होत आहे.




