सुधीर उध्ववराव मेथेकर, जेष्ठ पत्रकार, पुणे
पुणे, ता 25: वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. हे असले तरी हिंदू धर्मातील बहुतांश भाविक/ श्रद्धाळु आषाढी आणि कार्तिकी एकादशीला उपवास धरतात ! आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’, असे म्हणतात आणि चार महिने निद्राअवस्थेत गेलेले श्री भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात, तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी होय.
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’, असे म्हणतात.
देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरि शयनी एकदशी असे म्हटले शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.
आसुरी शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, असे समजले गेले आहे. या एकादशीला भोजन न करता उपवास करावा असे संकेत आहेत. उपवास म्हणजे जवळ बसणे म्हणजे काय तर शरीराची ,खाण्याची चिंता सोडून सगळे तनमन देवाशी एकाग्र करून देवाच्या जवळ बसणे. खरं तर उपवास किंवा लंघन ही एक अतिशय उपयोगी अशी चिकित्सा म्हणून आयुर्वेदानेही वर्णन केली आहे.
पाऊस नुकताच सुरु होतो तेव्हा पाणी जड असते, हवा गार असते आणि पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे लंघन करून या पचन शक्तीला मदत करण्याच्या हेतूने उपवासाची योजना केलेली आहे .
भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो.
विशेष करून या दोन्ही एकादशीला पंढरपूर आणि आळंदी येथे वारकरी आणि भाविक विठ्ठल-रखुमाई आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आवर्जून जातात. वारकरी संप्रदायात या एकादशींचे फार महत्त्व आहे. जगभरातील सर्वात मोठा उत्सव म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कारण विविध राज्यातील, धर्मातील वारकरी न बोलवता पंढरीच्या व माऊलींच्या वारीत सहभागी होतात ! येथे जातीधर्माला कुठेही थारा नाही. एकदिलाने विठुरायाच्या व माऊलींच्या दर्शनासाठी एकरूप होऊन जातात. हीच खरी आपली संस्कृती, ओळख आहे जी सर्व संतांनी निर्माण केली आहे.




